Representative image

नंदुरबार जिल्हा पोलीस तर्फे विविध उपक्रम

नंदुरबार: (सप्टेंबर 7) दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोजी पासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. गणेशोत्सव काळात नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश मंडळांना मदत व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमांमध्ये मागील वर्षी गणेशोत्सव काळात डी.जे. / डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करणारे, गुलाल न उधळता मिरवणूक काढणाऱ्या मंडळांचा सत्कार तसेच गणेश मंडळाच्या ठिकाणी CCTV यंत्रणा कार्यान्वीत करणे इत्यादी उपक्रमांचा व एक खिडकी योजना, पाणपोई इत्यादी सुविधांचा समावेश आहे.

गणेशोत्सव काळात गणपती मंडळांना गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारणी करणे, तात्पुरते वीज जोडणी, नगरपालिकेशी संबंधित दुरुस्तीची कामे इत्यादी विविध प्रकारच्या परवान्यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विविध ठिकाणी जावे लागते, त्यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची गैरसोय होत होती ही बाब लक्षात घेवून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी गणेशोत्सव मंडळांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे ” एक खिडकी योजना नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर एक खिडकी योजनेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित गणेशोत्सव मंडळ ज्या ठिकाणी गणेश मंडळाची स्थापना तसेच स्टेज, मंडप किंवा इतर देखावे उभारणार आहे, त्या जागेची संबंधित पोलीस ठाण्यामार्फत पाहणी केली जाईल. पायी ये-जा करणाऱ्या लोकांना किंवा वाहनांना त्रास होणार नाही याची खात्री केल्यानंतरच संबंधित गणेश मंडळाला परवाना दिला जाईल.

गणेशोत्सव काळात गणेश मंडळाकडून मंडप, स्टेज किंवा गणेश मंडळ स्थापन परवानगी करीता कोणत्याही प्रकारचे शुल्क नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी एक खिडकी योजनेचा लाभ घेवून सर्व आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करुन घ्याव्यात असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी केले. 

तसेच गणेशोत्सव काळात गणेश मूर्तीची स्थापना / विसर्जन मिरवणुकीचे वेळी ध्वनी प्रदूषण निर्माण होईल अशी साधने ( डी.जे. व डॉल्बी ) यांचा वापर केल्यामुळे किंवा डी.जे. व डॉल्बी सिस्टीमवरून उच्च आवाजात गाणी वाजविल्यामुळे ध्वनी प्रदूषण होवून सार्वजनिक शांततेचा भंग होतो. तसेच डी.जे. व डॉल्बीच्या उच्च आवाजामुळे वृध्द् इसम, आजारी इसम, लहान बालके यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे गणेशोत्सव व इतर सण उत्सव साजरे करतांना डी.जे. व डॉल्बी सिस्टिमचा वापर न करता पारंपरिक वाद्य वाजवून उत्साहात सण साजरे करावे, असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी सांगितले आहे. मागील वर्षी साजरे करण्यात आलेले सर्व धर्मीय सण, उत्सव, महापुरुषांची जयंती इत्यादी डी.जे. व डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्य वाजवून साजरे झाल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून जिल्हा पोलीस दलाचे व जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहे.

त्याचप्रमाणे गणेशोत्सव काळात गणेश मूर्तीची स्थापना / विसर्जन मिरवणुकीचे वेळी गुलालाचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणावर प्रदूषण बरोबरच डोळे, त्वचेला इजा व इतर शारीरिक त्रास होतो. त्यामुळे गुलालाचा वापर न करता फुलांच्या पाकळ्यांचा वापर केल्यास प्रदूषण होणार नाही तसेच स्थापना / विसर्जन मिरवणूकीत सहभागी होणारे किंवा मिरवणूक पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांना शारीरिक त्रास होणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त सार्वजनिक किंवा खाजगी गणेश मंडळांनी श्री गणेश मूर्तीची स्थापना / विसर्जन मिरवणुकीचे वेळी जास्तीत जास्त फुलांच्या पाकळ्यांचा वापर करावा. तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव काळात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी स्वच्छ व थंड पाण्याची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आलेली आहे.

तसेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.श्री.बी.जी.शेखर पाटील यांचे संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या एक कॅमेरा पोलीसांसाठी या योजनेंतर्गत मोठ्या किंवा गर्दी होणाऱ्या गणपती मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून श्री गणेश स्थापनेच्या ठिकाणी CCTV कॅमरे बसवावेत. तसेच जिल्ह्यात उपक्रमांतर्गत विविध चौकात, गर्दीच्या ठिकाणी CCTV कॅमेरे असल्याने यावर्षी बहुतांश गणेश मंडळे व गर्दीचे ठिकाणे CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत आली आहेत. त्यामुळे टवाळखोर तसेच छेडछाड करणाऱ्या इसमांना आळा बसणार आहे.

मागील वर्षी गणेशोत्सव काळात गणेश मुर्तीची स्थापना व विसर्जन मिरवणूकीत डी.जे. / डॉल्बीचा वापर न करता पारंपरीक वाद्यांचा वापर करणे, गुलालाचा वापर न करता फुलांच्या पाकळ्यांचा वापर करणे, गणेश स्थापना काळात उत्कृष्ट देखावा सादर करणे, वेळेच्या पूर्वी विसर्जन मिरवणूक संपविणे, श्री गणेशाचे जागेवर विसर्जन करणे, गणेशोत्सव काळात समाजहितासाठी प्रबोधनपर उपक्रम किंवा कार्यक्रम राबविणे, गणेशोत्सव काळात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून श्री गणेश स्थापनेच्या ठिकाणी CCTV कॅमरे बसविणे, पोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश उत्सव साजरा करणे, स्वयंसेवक नेमून शिस्त पाळणारे गणेश मंडळ इत्यादी निकष पूर्ण करणाऱ्या सर्व व इतर नोंदणीकृत मंडळांचा नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे या आठवड्यात सत्कार करण्यात येणार आहे.   

Agroindia Writer
Agroindia Writer
Articles: 55

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *